
मुंबई प्रतिनिधी
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक तारे उदयाला आले, काही लोपले, काहींनी मात्र काळाच्या पडद्यावर आपला ठसा उमटवला. अशाच एका झगमगत्या सुपरस्टारबद्दल सध्या चर्चांना उधाण आलं आहे, जो केवळ अभिनयासाठी नव्हे, तर त्याच्या प्राणीप्रेमासाठीही प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, या अभिनेत्याकडे तब्बल ११४ कुत्र्यांचा संग्रह आहे! होय, तुम्ही बरोबर वाचलंत – ११४ कुत्रे!
कोण आहे हा प्राणीप्रेमी सुपरस्टार?
हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नाही, तर एकेकाळचा ‘डिस्को डान्सर’ – मिथुन चक्रवर्ती! चार दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलेले मिथुन आजही आपल्या अनोख्या लाइफस्टाईलमुळे चर्चेत आहेत. संजय दत्त आणि गोविंदासारख्या मोठ्या कलाकारांपेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे, आणि त्यांचे वैभव पाहून कोणीही थक्क होईल.
दोन आलिशान बंगले आणि शंभरावर कुत्रे!
मिथुन यांचं मुंबईतील मड आयलंड येथील ४५ कोटींचं आलिशान घर १.२ एकर जागेवर वसलेलं आहे. येथेच ७६ कुत्र्यांसाठी विशेष जागा आहे, जिथे त्यांचं सर्वतोपरी पालनपोषण केलं जातं. इतकंच नाही तर, त्यांच्या ऊटी येथील बंगल्यात आणखी ३८ कुत्रे आहेत. दोन्ही ठिकाणी एकूण ११४ कुत्र्यांचा परिवार त्यांनी सांभाळला आहे. त्यांच्या प्रत्येक कुत्र्याची विशेष निगा राखली जाते – हीच त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष आहे.
४९ वर्षांचा प्रवास, ३५० हून अधिक चित्रपट
१९७६ मध्ये ‘मृगया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मिथुनना पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी तब्बल ३५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. आज त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा ४०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
तुलनेत, संजय दत्त यांची संपत्ती अंदाजे २९५ कोटी तर गोविंदाची सुमारे १५० कोटी रुपये आहे. यावरूनच मिथुन यांचा आर्थिक दृष्टीने बॉलिवूडमधील दबदबा अधोरेखित होतो.
उद्योजकतेचा झळाळता अध्याय
मिथुन हे केवळ अभिनेता नाही, तर ‘मोनार्क ग्रुप’ नावाच्या हॉटेल चेनचे यशस्वी मालक आहेत. ऊटी, मैसूर यांसारख्या पर्यटन स्थळांवर त्यांच्या उच्चभ्रू हॉटेल्सची मालिका आहे.
लक्झरी कार्सचं कलेक्शन
प्राण्यांप्रमाणेच मिथुन यांना गाड्यांचाही प्रचंड शौक आहे. त्यांच्या ताफ्यात मर्सिडीज बेंझ, व्होक्सवॅगन, फोर्ड एंडेवर, टोयोटा फॉर्च्युनर यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
आजही मिथुन चक्रवर्ती हे नाव केवळ अभिनयापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनशैलीतून समाजासमोर एक वेगळी उदाहरणं ठेवली आहेत. प्राणीमात्रांवरील प्रेम, आर्थिक स्थैर्य, आणि विविध क्षेत्रांतील यशाने मिथुनदांना ‘सुपरस्टार’ म्हणणे खरंच योग्य ठरतं!