
सातारा प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील गुढे गावात घरामागील गंजीतून जनावरांसाठी वैरण काढत असताना घोणस सापाने दंश केल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शशिकला रमेश पाटील (वय ४५) असे या मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी शशिकला पाटील या त्यांच्या राहत्या घराच्या मागील गंजीतून जनावरांसाठी वैरण काढत होत्या. याच दरम्यान घोणस जातीच्या विषारी सापाने त्यांना दंश केला. त्यांना सुरुवातीला याची जाणीव झाली नाही. मात्र, काही वेळातच घरात आल्यावर त्या बेशुद्ध झाल्या.
कुटुंबीयांनी तातडीने त्यांना प्रथम तळमावले येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर गंभीर स्थितीत कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात हलवले. परंतु उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामस्थांनी घटनास्थळी केलेल्या शोधातून घोणस सापाने दंश केल्याचे स्पष्ट झाले. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर गुढे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शशिकला पाटील या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व पुतण्यांचा परिवार आहे. गुढे पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ कुंभार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
गावकऱ्यांमध्ये या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.