
मुंबई प्रतिनिधी
मुंबई |प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने संतापलेल्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना अंधेरीत घडली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात मृताच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
घटकोपरच्या भटवाडी भागात राहणारे शंकर कांबळे (५८) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांची मोठी मुलगी सोनाली बाईत (३७) विवाहित असून तिला दोन मुले आहेत. मात्र पतीला सोडून ती २०२२ पासून महेश पांडे (२७) याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. या संबंधास घरच्यांचा विरोध होता, विशेषतः वडील शंकर कांबळे यांचा.
८ जून रोजी महेश पांडे आणि शंकर कांबळे यांच्यात वाद होऊन पांडेने त्यांना मारहाण केली होती. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी समज देऊन प्रकरण सोडवले, अशी माहिती मृताच्या मुलगा राहुल कांबळे (२८) याने दिली.
या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत पुन्हा ११ जून रोजी अंधेरी कुर्ला रोडवरील महेश लंच होमजवळ सोनाली आणि महेशने शंकर कांबळे यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या राहुललाही मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत शंकर कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रेमसंबंधाला विरोध केल्याने झालेल्या वादातून ही मारहाण झाली असून, त्यात शंकर कांबळे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.”
एमआयडीसी पोलिसांनी सोनाली बाईत आणि महेश पांडे या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३, ११५ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.