
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वरळी परिसरात रविवारी सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून ६० वर्षीय पतीने आपल्या ५३ वर्षीय पत्नीवर देशी बनावटीच्या बंदुकीतून गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर त्याच बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोहोचलेल्या वरळी पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. घटनास्थळावरून देशी बनावटीची बंदूकही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संबंधित बंदूक आरोपीच्या ताब्यात कशी आली, याबाबत तपास सुरु आहे. कौटुंबिक वादातून ही गंभीर घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
पोलिसांकडून परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून, या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास करण्यात येत आहे.