
राजस्थान वृत्तसंस्था
राजस्थानमध्ये 11 मित्र नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरु आहे. राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये पिकनिकसाठी गेलेल्या 11 तरुणांचा नदीत पोहण्याचा मोह जीवाशी बेतला.
बनास नदीत अंघोळीसाठी उतरलेले हे 11 जण वाहून गेले. यापैकी आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या वृत्ताला स्थानिक पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. वाहून गेलेल्या तिघांचा शोध सुरु असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
नेमकं घडलं काय?
बनास नदीमध्ये हे 11 मित्र अंघोळीसाठी नदीत उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडाले. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना आहे. बनास नदीच्या एका जुन्या पुलापाशी हे तरुण पिकनिकसाठी गेले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण एकत्रच पाण्यात उतरले होते. परंतु, काही वेळातच पाण्याचा वेग वाढला आणि सर्वजण एकामागोमाग एक पाण्यात खेचले गेले.
स्थानिकांनी दिली माहिती, मदत पोहोचली पण…
डोळ्यासमोर हे तरुण वाहून जात असताना स्थानिकांनी आरडाओरडा करत पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. टोंक पोलीस आणि राज्य आपत्कालीन दलाची एक टीम तिथे मदतीसाठी पोहोचली. मात्र ही मदत येईपर्यंत फार उशीर झाला होता. या तरुणांना शोधण्यासाठी शोध मोहिम सुरु करण्यात आली. त्यावेळी आठ तरुणांचे मृतदेह सापडले. अजून तीन जणांचा शोध सुरु आहे.
यापूर्वीही इथं अनेकजण बुडालेत
सर्व मृतदेह सआदत हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्या कुटुंबियांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. डॉक्टरांनी या सर्व आठही जणांना मृत घोषित केले आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात ते तरुण उत्तरते होते तो खोलगट आहे. त्यामुळे यापूर्वीही अनेकजण तिथे बुडालेले आहेत. या दुर्घटनेची माहिती समजताच सआदत हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली. मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
मृतांची नावं खाली समोर
सर्व मयत व्यक्ती जयपूरमधील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये नौशाद (वय 35, रा. हसनपुरा), कासीम (रा. हसनपुरा), फरहान (रा. हसनपुरा), रिजवान (26, रा. घाटगेट), नवाब खान (28, रा. पानीपेच कच्ची बस्ती), बल्लू (रा. घाटगेट), साजिद (20, रा. घाटगेट), साजिद (20) यांचा मृत्यू झाला, तर बेपत्ता व्यक्तींमध्ये शाहरुख (30, रा. घाटगेट), सलमान (26, रा. घाटगेट), समौर (32, रा. घाटगेट) यांचा समावेश आहे.