
पुणे : पुण्यातील बावधनच्या शिंदेनगर भागातील फोटो स्टुडिओला रविवारी सायंकाळी भीषण आग लागली. पाच मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टुडिओला आग लागली आणि इमारतीतील तीन फ्लॅटमध्ये पसरली. धुराने भरलेल्या आवारातून सात जणांची सुटका करण्यात आलीअसून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सायंकाळी सहाच्या सुमारास शिंदेनगर येथील एका दुकानाला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.कोथरूड, वारजे, पाषाण, औंध, एरंडवणा अग्निशमन केंद्रांतून गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. इमारतीच्या बाजूला असलेल्या स्नॅप आर्ट ॲन्ड फोटो स्टुडिओला ही आग लागली होती. स्टुडिओमध्ये फ्लेक्स, फोटो फ्रेम व इतर साहित्य होते. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत
स्टुडिओमधील साहित्य जळून खाक झाले.
स्टुडिओच्या बाजूलाच असलेल्या तीन सदनिकांना आगीची झळ बसली. त्यामध्ये एक महिला धुरामुळे बेशुध्द पडली. तिला जवानांनी बाहेर काढून उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पाठवून दिले, तर अन्य सहा नागरिकांना धुरातून बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठविल्याची माहिती अग्निशमन अधिकारी पाठविल्याची माहिती अग्निशमन अधिकारी गजानन पाथरूडकर यांनी दिली.जवानांनी चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा करून काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले.त्यानंतर कुलिंग करण्यात आले. दरम्यान,आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या स्टुडिओला लागून एक इमारत आहे, तर हाकेच्या अंतरावरच पेट्रोल पंप असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.