
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : सकाळच्या प्रचंड गर्दीत रेल्वे प्रवास जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून १० ते १२ प्रवासी खाली पडल्याची माहिती समोर आली असून, या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उर्वरित प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुष्पक एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाडीत घडली आहे. आज सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघाली होती. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान दरवाज्याला लटकून प्रवास करणारे काही प्रवासी अचानक खाली कोसळले. सकाळच्या शालेय व महाविद्यालयीन गर्दीमुळे ट्रेनमध्ये प्रचंड गजबज होती. गर्दी आणि धक्काबुक्की यामुळे दरवाज्यावर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा तोल जाऊन ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
घटनास्थळी रेल्वे प्रशासनाने तत्काळ रुग्णवाहिका पाठवल्या असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया देताना मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले की, “मुंब्रा-दिवा दरम्यान पाच प्रवासी खाली पडल्याची माहिती आहे. ही ट्रेन नेमकी कोणती होती, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.”
दरम्यान, या दुर्घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या गर्दी नियंत्रण यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोज सकाळच्या वेळेस लाखो प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना केल्या जातात का, हे पाहणं गरजेचं ठरतं आहे.