
अलिबाग प्रतिनिधी
किल्ले रायगडावर पार पडलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर घरी परतणाऱ्या शिवप्रेमींना अपघाताची झळ बसली. माणगाव तालुक्यातील बोरवाडी गावाच्या हद्दीत एका जीप वाहनाला झालेल्या अपघातात दोन शिवप्रेमी गंभीर जखमी झाले असून, दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी रायगडावर उपस्थित राहून शिवराज्याभिषेक सोहळ्याला साक्षी दिली. उत्साहाने भरलेला हा सोहळा संपल्यानंतर अनेक जण परतीच्या मार्गावर निघाले. याच दरम्यान बोरवाडी गावाजवळ मार्गावरील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यावर उलटली.
अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे शिवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर परतीच्या मार्गावर घडलेली ही दुर्घटना अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे.