
सातारा प्रतिनिधी
शहराला हरित सातारा बनवणे या उद्देशाने साताऱ्यात आज भव्य वृक्षलागवड उपक्रम पार पडला. सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमात सातारा पोलिस मैदान व सदरबाजार परिसरात तब्बल 2000 झाडांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, तसेच अभिनेता सयाजी शिंदे हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय अनेक पर्यावरणप्रेमी संस्था, विद्यार्थी, नागरिक, पोलीस व नगरपरिषदेचे कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे आयोजन सातारा नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
नगरपरिषदेच्यावतीने उपस्थितांना तुळशीचे रोप आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.वृक्षलागवडीसाठी निवडण्यात आलेली झाडं ही स्थानिक वातावरणाशी सुसंगत असलेली फळझाडं, छायादायक व औषधी वनस्पती होती. परिसरातील रिकाम्या जागांमध्ये ही लागवड करण्यात आली.
या उपक्रमादरम्यान भाष्य करताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “साताऱ्याचा निसर्ग ही आपल्याला लाभलेली अनमोल देणगी आहे. झाडं लावणं आणि वाढवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. हे केवळ घोषवाक्य नसून कृतीतूनही ते दिसलं पाहिजे.”असे हे ते म्हणाले.
शेवटी लावलेल्या झाडांचे संरक्षण आणि संगोपण करण्याचे शपथ घेण्यात आली.