
सातारा प्रतिनिधी
सातारा | सातारा-जावली मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे नेते छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘Chh. ShivendraRaje Bhonsle’ या नावाने असलेले हे पेज हॅक झाल्याने त्यावरून सध्या नियंत्रण गेले असून, याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दररोज हजारो चाहत्यांकडून पाहिले जाणारे हे पेज शिवेंद्रसिंहराजे यांच्या विविध राजकीय आणि सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यासाठी वापरले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पेजवरील अॅडमिन अॅक्सेस गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. यानंतर पेज हॅक झाल्याचे स्पष्ट झाले असून, संबंधित हॅकरवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
चाहत्यांना आवाहन : प्रतिक्रिया देऊ नये
सदर पेजवर भविष्यात कुठलीही अनधिकृत पोस्ट आढळल्यास ती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी संबंधित नसेल. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्ते, समर्थक, चाहत्यांनी अशा पोस्टवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सध्या सोशल मीडियावरील अकाउंट हॅकिंगच्या घटना वाढत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. याआधी अनेक दिग्गज नेते, कलाकार, खेळाडूंची खाती हॅक झाल्याच्या घटना घडल्या असून, आता साताऱ्याचे आमदार छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याने यामध्ये आणखी भर पडली आहे.