चाकूर प्रतिनिधी
आई वडीलांच्या इच्छेविरूध्द पळून जावून सहा महिन्यापुर्वी दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमविवाह केलेल्या मुलींला माहेरहून वीस लाख रूपये घेऊन ये म्हणून त्रास देऊन जीवे मारल्याप्रकरणी आष्टा (ता.चाकूर) येथील नवरा, सासरा व दीराविरूध्द मुलींच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून हुंडाबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हटकरवाडी (ता. चाकूर) येथील अर्पीता (वय-२०) या मुलींने आई वडीलांच्या इच्छेच्या विरूध्द आष्टा येथील गौरव संजय शेळके यांच्यासोबत १२ आॅक्टोंबर २०२४ रोजी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता, गौरवचे नळेगाव येथे कापड दुकान होते त्यांने ते दुकान बंद करून दोघे नवरा बायको पुणे येथे राहत होते.
गौरव हा अर्पीताला माहेरकडील मंडळींशी संपर्क साधू देत नव्हता. तुझ्यामुळे माझे कापड दुकान बंद पडले आहे म्हणून तो सतत तीला त्रास देत होते. पंधरा दिवसापुर्वी तीने वडीलांशी मोबाईलवरून संपर्क साधून सासरकडील मंडळी वीस लाख रूपयाची मागणी करीत असून मला त्रास देत असल्याची सर्व हकीकत सांगितली होती.
यानंतर दुसऱ्या दिवशी मुलीने आईची भेट घेऊन तुमच्या सर्वांच्या मनाविरूध्द जाऊन मी लग्न केल्याचा मला पश्चाताप होत आहे. पैशासाठी मला त्रास दिला जात असल्यांचे सागून आईच्या गळ्यात पडून रडत होती. तसेच इतर नातेवाईकांनाही तीने फोन करून याची माहिती दिली होती.
गुरूवारी (ता.२९ मे ) सकाळी आष्टा येथील श्रीमंत शेळके यांनी अर्पीताच्या वडीलांना फोन करून तुमच्या मुलीचा विजेचा धक्का लागला असून तीला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगितले. यामुळे मुलींचे वडील, आई, चुलते व गावातील काही जणांना सोबत घेऊन रुग्णालयात गेले असता मुलगी मृत अवस्थेत आढळून आली.
याबाबत गावातील लोकांशी संपर्क साधला असता अर्पीताच्या मृत्युबाबत चुकीची माहिती सांगितली जात असल्याचे समजले. माझ्या मुलीला २० लाख रूपये घेऊन ये, म्हणून शाररीक व मानसीक छळ करून मारून टाकले असल्याची तक्रार मुलींच्या वडीलांनी दिल्यावरून नवरा गौरव संजय शेळके, सासरा संजय श्रीकांत शेळके, दिर कृष्णा संजय शेळके यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा टाळाटाळ
हुंड्यासाठी मुलींचा बळी गेल्यानंतर पोलिस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत होते यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतला. उपविभागीय पोलिस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांनी नातेवाईकांशी चर्चा करून फिर्याद घेतली व रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.


