
सातारा प्रतिनिधी
सातारा|सातारा जिल्ह्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी.आर.एफ.) एक पथक कराड येथे दाखल झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने हे पथक तैनात केले आहे.
कराड उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी एन.डी.आर.एफ. पथकाचे औपचारिक स्वागत केले. एकूण २५ सदस्यांच्या या पथकात दोन अधिकारी आणि प्रशिक्षित जवानांचा समावेश आहे. पावसाळी काळात संभाव्य पूर, भूस्खलन किंवा इतर आपत्तीजनक परिस्थितींमध्ये जलद शोध व बचाव कार्य करण्यासाठी हे पथक सातारा जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे.
पथकाकडे तीन बोटींसह मान्सून काळात उपयोगी ठरणारे सर्व अत्यावश्यक शोध आणि बचाव साहित्य उपलब्ध असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पथक २४ तास सज्ज राहणार आहे.
जिल्हा प्रशासनाने या पथकाच्या तैनातीमुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असल्याची माहिती दिली आहे.