
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाने साताऱ्यात आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. अमोल लक्ष्मण जाधव हे मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
यांनी साताऱ्यातील कोडोली येथे सासरवाडीत येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसाच्या पत्नीसह सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केस मागे घेण्यासाठी २० लाख रुपयांची संशयितांनी मागणी केली होती. पैसे दिले नाही, तर नोकरी घालवतो, अशी धमकीही दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.पत्नी कोमल अमोल जाधव (रा. सातारा), सूरज भोसले (रा. घाडगेवाडी, ता. फलटण), प्रवीण अडसूळ, शिवाजी अडसूळ, सौरभ सकट, विवेक काटकर (सर्व रा. सातारा) अशी संशयितांची नावं आहेत. याप्रकरणी सचिन लक्ष्मण जाधव (वय ३५, सध्या रा. मुंबई, मूळ रा. सासवड झणझणे, ता. फलटण) यांनी तक्रार दिली आहे.
पत्नीकडून मानसिक त्रास, मुलाला भेटू दिलं जात नव्हतं
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल जाधव यांनी गुरुवारी साताऱ्यात पत्नी कोमल जाधव यांच्या माहेरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. कोमल जाधव आणि सूरज भोसले हे दोघे अमोल जाधव यांना मानसिक त्रास देत होते. पत्नी कोमल यांनी अमोलचा दुसरा विवाह लावून दिला. त्यानंतरही कोमलने अमोल यांच्यावर खोटी केस दाखल केली होती. त्यांचा मुलगा अद्वीक याला भेटू दिलं जात नव्हतं. त्यामुळे अमोल हे मानसिक दडपणाखाली होते.
२० लाखांची मागणी
त्यातच अमोल यांच्या विरोधात दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी २० लाख रुपये देण्याची मागणी संशयितांनी केली होती. पैसे दिले नाही, तर नोकरी घालवतो, अशी धमकीही संशयितांनी दिली होती. या सर्व घटनेमुळे अमोल जाधव दडपणाखाली असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार अमोल जाधव यांच्या भावाने सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे.आत्महत्येस प्रवृत्त केल्याने अमोल जाधव यांनी गळफास घेतला असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर सातारा पोलिसांनी अमोल यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.