
मुंबई प्रतिनिधी
दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अनेक मुंबईकरांनी या भुयारी मेट्रोचे कौतुक केले.
भुयारी मेट्रो ही मुंबईच्या ट्रॅफिकपासून सुटका करण्यासाठी महत्त्वाची ठरेल, अशी भावना सुद्धा व्यक्त करण्यात आली. पण या भुयारी मेट्रोची पहिल्या पावसातच पोलखोल झाल्याचे पाहायला मिळाले. कारण सोमवारी 26 मे मुंबईत झालेल्या पावसामुळे भुयारी मेट्रोत पाणी शिरले. वरळी येथील आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो मार्गाच्या स्थानकात पाणी शिरल्याने ही मेट्रो बंद करण्यात आली. भुयारी मेट्रोचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
सोमवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आचार्य अत्रे चौक स्थानकाजवळील बांधकामाधीन भागात पाणी झिरपले. या पार्श्वभूमीवर एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी माध्यमांशी संवाद साधत घटनेचं स्पष्टीकरण दिलं आणि सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. pic.twitter.com/6u3yN44LFo
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) May 27, 2025
आचार्य अत्रे चौक या भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचल्यानंतर याबाबत एमएमआरसीकडून स्पष्टीकरण देण्यात आली. पण आता घटनेबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्याकडून सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तर, मुंबई मेट्रोची ही यंत्रणा सुरक्षित असल्याची माहिती भिडे यांच्याकडून देण्यात आली आहे. हायटाइड आणि अतिवृष्टी यामुळे भुयारी मेट्रोत पाणी साचले, पण गेले दोन दिवस प्रवासी या मार्गावरून सुरक्षित प्रवास करत असल्याची माहिती अश्विनी भिडे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.