पुणे प्रतिनिधी
पुण्यातील हगवणे कुटुंबियांनी सून वैष्णवी हगवणे हिचा छळ करून केलेल्या अमानुष वागणुकीमुळे संतापाची लाट उसळली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
स्थानिक नेते व नागरिकांकडूनही जोरदार निषेध व्यक्त होत आहे.या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही निष्क्रीयतेचे आरोप होत आहेत. दरम्यान, आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिला आघाडीने भुकूम येथील हगवणे यांच्या घरावर शेण फेकून आणि काचा फोडून तीव्र निषेध व्यक्त केला.
या प्रकरणात राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, मुलगा सुशील, शशांक आणि करिश्मा या सर्व कुटुंबियांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आसरा देणाऱ्या पाच जणांनाही अटक करण्यात आली असून त्यामध्ये कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याचाही समावेश आहे.या प्रकरणातील निखिल चव्हाण अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पिंपरी-चिंचवड महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. यावेळी त्यांनी म्हटले की, “वैष्णवीच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. एका निरागस मुलीचे शोषण करून तिचा जीव घेतला गेला आहे. या आरोपींची गावात धिंड काढून त्यांच्या तोंडाला काळं फासावं अशी मागणी आम्ही करत आहोत.वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर लोकांमध्ये एक संतापाची मोठी लाट बघायला मिळते आहे.


