
मुंबई प्रतिनिधी
धुंवाधार पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठा फटका बसला. मुंबईत तिघांच्या अंगावर झाड कोसळलं. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
तर दोघेजण सुदैवाने बचावले. विक्रोळीतील कन्नमवारनगरमध्ये ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीच्या कन्नमवारनगर -२ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. गणेश मैदानामध्ये तीन मित्र गप्पा मारत उभे होते. त्याचवेळी अचानक भलंमोठं झाड या तरुणांच्या अंगावर कोसळलं. या घटनेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे इतर दोन मित्र बचावले. तेजस नायडू असं या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे विक्रोळीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
गणेश मैदानामध्ये असलेले हे जंगली झाड खूप वर्षे जुने होते. आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे हे झाड अचानक कोसळलं. झाड अंगावर पडल्यामुळे तेजसचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचे दोघे मित्र सुखरूप असून घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. या झाडाला कापून तेजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी तेजसचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांनी या घटनेला महानगर पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे. कारण हे झाड मुळासकट पडले नसून जी बाजू खराब झाली होती त्या ठिकाणावरून हे झाड खाली कोसळले आहे. त्यामुळे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाला मदत करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यामुळे झाडं कोसळल्याच्या घटना या दरवर्षी घडत असतात