
मुंबई प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देत शहर आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
गेल्या १२ तासांत मुंबईच्या मध्यवर्ती भागात सुमारे २५२ मिमी पावसाची नोंद झाली असून, अल्पावधीत पडलेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते. मात्र घाटकोपर, सायन, मीलन सबवे, अंधेरी सबवे, किंगसर्कल, हिंदमाता यांसारख्या सखल भागांतील पाण्याचा पूर्ण निचरा करण्यात यश आले असून, सध्या स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यंदाचा पाऊस दरवर्षीच्या तुलनेत १५ दिवस आधी आणि अधिक प्रमाणात झाल्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागल्याचे नमूद केले. मात्र महानगरपालिका आणि राज्य प्रशासन परिस्थितीवर योग्य वेळी नियंत्रण मिळवत असून, पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आढावा बैठकीस राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.