
मुंबई प्रतिनिधी
मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या सुधारणा कामांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी रविवारी रस्ते पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान मालाड पूर्व येथील गोविंदभाई श्रॉफ रोड ते एस.व्ही. रोड मार्गाची त्यांनी पाहणी केली.
संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिलेल्या माहितीनुसार, सदर रस्त्याच्या क्यूरींगचे काम पूर्ण झाले असून, काही दिवसांत संपूर्ण रस्ता सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात येईल.
या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, आमदार विद्याताई ठाकूर, भाजपा मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्त्यांच्या दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणाऱ्या कामांबाबत शेलार यांनी समाधान व्यक्त केले असून, नागरिकांच्या सोयीसाठी अशा प्रकल्पांची नियमितपणे पाहणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.