
स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई|सीएसएमआय विमानतळ येथील आज सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत तब्बल ५.७५ किलो सोनं जप्त केलं असून, त्याची एकूण किंमत ₹५.१० कोटी इतकी आहे. हे सोनं दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सापडले असून, दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण २ जणांना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या प्रकरणात, एक व्यक्ती जो विमानतळावरील लाउंजमध्ये काम करत होता, त्याला स्टाफ डिपार्चर क्षेत्रातून जाताना अडवण्यात आलं. त्याच्या अंगावरील आतील कपड्यांमध्ये “गोल्ड डस्ट इन वॅक्स” स्वरूपात ६ पाउच सापडले. या पाउचमधील सोन्याचं निव्वळ वजन २८०० ग्रॅम असून, त्याची किंमत सुमारे ₹२.४८ कोटी इतकी आहे. हे सोनं त्याला एका ट्रांझिट प्रवाशाकडून दिल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात, एक कंत्राटी कर्मचारी स्टाफ एक्झिट पॉइंटवरून जात असताना त्याच्या जॅकेटच्या खिशात २९५० ग्रॅम सोनं आढळून आलं. त्याचेही स्वरूप “गोल्ड डस्ट इन वॅक्स” असलेले असून, त्याची किंमत सुमारे ₹२.६२ कोटी आहे. हे सोनं देखील ट्रांझिट प्रवाशाकडून दिलं गेलं असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.
दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. विमानतळावरून सोन्याची तस्करी रोखण्यासाठी सीमाशुल्क विभागाने सतर्कतेची भूमिका घेतली असून, अशा प्रकारांवर लक्ष ठेवून कठोर कारवाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.