
स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई|खेरवाडी पोलिसांनी कोकेन विक्री प्रकरणाचा पर्दाफाश करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टोळीतील दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी एकूण ८१ ग्रॅम ‘कोकेन’ हस्तगत केले असून त्याची अंदाजे बाजारभाव किंमत ३२,४०,००० रुपये आहे.
खेरवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जुनैद नईम खान (वय २६), रा. ट्रान्झीट कॅम्प, वांद्रे पश्चिम, मुंबई याला एम.आय.जी. क्लब मैदानाच्या भिंतीलगत, रामकृष्ण परमहंस मार्ग, बांद्रा (पूर्व) येथे सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ ग्रॅम कोकेन (किंमत सुमारे १.२० लाख रुपये) जप्त करण्यात आले. याप्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपासादरम्यान, जुनैद याने नायजेरियन नागरिक ओलनरेवाजू जोवीता इमूओबू (वय ४९), रा. चिंबई कोळीवाडा, वांद्रे पश्चिम, मुंबई हिच्याकडून कोकेन खरेदी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी जोवीता हिच्या घरावर छापा टाकत ७९ ग्रॅम कोकेन (किंमत सुमारे ३१.६० लाख रुपये) जप्त केले.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण, अप्पर पोलीस आयुक्त परमजीत सिंग दहीया, पोलीस उप आयुक्त मनीष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई मपोनि वारे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि काते, सपोनि भिसे, पोउनि लोंढे, पोउनि सचिन पाटील, पोउनि प्रियांका चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तस्करीच्या साखळीतील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.