
स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई|अमली पदार्थ विरोधी पथक परिमंडळ-०६ आणि आतंकवाद विरोधी पथक तसेच आरसीएफ पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत मेफेड्रोन (MD) या अमली पदार्थाच्या मोठ्या साठ्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण सुमारे किंमत १३.३७ कोटींचा MD जप्त केला असून ५ आरोपींना अटक केली आहे.
परिसरात गस्त घालत असताना आरसीएफ परिसरात एक संशयित व्यक्ती ड्रग्स विकताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी त्याला अटक करून झडती घेतली असता त्याच्याकडून ४५ ग्रॅम मेफेड्रोन मिळून आला, ज्याची बाजारात किंमत सुमारे ४.५० लाख एवढी आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचा पुढील तपास करताना पोलिसांनी मुंबई आणि नवी मुंबई येथून एकूण ५ आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एकूण ६ किलो ६८८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आला असून त्याची बाजारातील एकूण अंदाजे किंमत १३.३७ कोटी इतकी आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती, सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहायक पोलिस आयुक्त राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या ऑपरेशनमध्ये पोलिस निरीक्षक समशेर तडवी, सहायक पोलिस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, पोलिस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सहायक पोलिस उपनिरीक्षक वाणी, पोलिस हवलदार पाटील, खैरे तसेच पोलिस शिपाई येळे, केदार, माळवे, सानप आणि राऊत यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपींच्या नेटवर्कबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.