
सातारा प्रतिनिधी
सातारा शहरात रस्त्यांचे रुंदीकरण, सुधारणा आणि सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामामुळे होणाऱ्या वृक्षतोडीमुळे निर्माण होणाऱ्या हरित तुटवड्याची भरपाई करण्यासाठी आता व्यापक वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत १ जूनपासून पोवई नाका ते वाढे फाटा आणि भूविकास बँक ते जुना आरटीओ चौक या मार्गांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या मोहिमेची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. शहराच्या हरित समतोलासाठी रस्त्याच्या दुतर्फा आणि डिव्हायडरमध्ये झाडे लावण्यात येणार असून, शक्य त्या ठिकाणी रीप्लांटेशन देखील केले जाणार आहे.
या विषयावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, हरित सातारा संस्था, निसर्गप्रेमी संघटना तसेच स्थानिक शाळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत शहरातील वृक्षतोड ही विकासकामांमुळे अनिवार्य झाली असली, तरी त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन वृक्षसंपदा जपण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून, सावली देणाऱ्या व लवकर वाढणाऱ्या प्रजातींची निवड करण्याचे निर्देश दिले आहेत.
वृक्षारोपणासाठी सोनचाफा, बकुळ, ताम्हिण, बहावा, बॉटल ब्रश, कडुलिंब, जांभूळ, पारिजातक, आवळा, कदंब, पळस, अर्जुन, कुसूंबी अशा अनेक देशी आणि उपयुक्त झाडांच्या प्रजातींची निवड करण्यात आली आहे.
या मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपरिषद तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्व निसर्गप्रेमी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन सातारा शहर हरित बनविण्यासाठी योगदान द्यावे.