
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडेखोरांनी एका उद्योगपतीच्या घरातून सोनं, चांदी चोरून नेली आहे. चोरून नेलेल्या सोन्या चांदीचे प्रमाण ऐकून पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत.
दरोडेखोरांनी छत्रपती संभाजीनगरातील उद्योगपती राधाकिशन लड्डा यांच्या घरातून तब्बल 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी चोरून नेली आहे.
दरोडेखोरांकडे बंदुका होत्या
मिळालेल्या माहितीनुसार उद्योगपती राधाकिशन लड्डा हे छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथे राहतात. गुरुवारी सकाळी त्यांच्या घरात दरोडा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी दरोडेखोरांनी चोरून नेल्याचे कळाले. घटना घडली तेव्हा लड्डा यांच्या घरामध्ये त्यांचा ड्रायव्हर आणि केअर टेकर होते. या दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे की दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधले आणि बंदुकीचा धाक दाखवला. आरडाओरडा केल्यास गोळी घालून ठार मारू अशी धमकी दिली होती.
असा पडला दरोडा?
दरोडेखोरांनी घरात घुसल्यानंतर केअर टेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवत त्याला धमकावलं. यानंतर त्याच्या धमकावत संपूर्ण घराची पाहणी केली. घरातील मौल्यवान ऐवज कुठे ठेवलाय हे कळाल्यानंतर दरोडेखोरांनी सोनं आणि चांदी चोरून नेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांसह घटनास्थळ गाठले होते. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे वाळूज परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ही घटना गंभीर असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.
परदेशात गेले असताना, पडला दरोडा
राधाकिशन लड्डा यांचा मुलगा अमेरिकेमध्ये शिकतो आहे. त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब आठ दिवसांपूर्वी अमेरिकेला गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा उचलत दरोडेखोर घरात शिरले होते. जळपास 6 दरोडेखोर या दरोड्यात सामील असल्याचे कळते आहे. लड्डा कुटुंब घरात नाही हे दरोडेखोरांना कसे कळाले ? या कृत्यामध्ये लड्डा कुटुंबाच्या परिचयातील व्यक्तीचा हात तर नाही ना अशा सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.