
मुंबई प्रतिनिधी
अपघातांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या शिवशाही बससेवेने अखेर एसटी महामंडळाच्या ताफ्यातून हद्दपार होणार आहे. प्रवासी सेवा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या या वातानुकूलित बस आता बंद करण्यात येणार असून, पुनर्बाधणी करून त्यांचे रूपांतर साध्या लालपरी किंवा हिरकणी (एशियाड) बसमध्ये केले जाणार आहे.
शिवशाही बससाठी एसटीने पूर्वीची लोकप्रिय एशियाड सेवा थांबवली होती. आता मात्र तीच एशियाड नव्याने रूपात पुन्हा अवतरणार आहे.पहिल्या टप्प्यात 100 शिवशाही बसचे रूपांतर हिरकणी बसमध्ये केले जाईल. यासाठी शिवशाही बसमधील वातानुकूलित यंत्रणा काढून टाकली जाईल, अंतर्गत रचना आणि रंगसंगतीत बदल करण्यात येतील.
या बदलांमुळे तिकीट दरातही काही प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता आहे.गमतीची बाब म्हणजे, शिवशाही बसचे एशियाडमध्ये रूपांतर करण्याच्या योजनेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाच माहिती नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. त्यांनी सांगितले की, “अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही. मात्र, जर अपघात, प्रवाशांच्या तक्रारी आणि सेवेतील अडथळे लक्षात घेऊन हा निर्णय प्रवासीहिताचा असेल, तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल.
महामंडळाकडे ७९० स्वमालकीच्या शिवशाही बस आहेत. त्यापैकी निम्म्याच बस प्रत्यक्ष प्रवासी सेवेत असून उर्वरित बस नादुरुस्त अवस्थेत कार्यशाळांमध्ये उभ्या आहेत. सुरूवातीपासूनच शिवशाही बस तांत्रिक बिघाड, अपघातांची वाढती संख्या, कमी वेग, वातानुकूलन व्यवस्था काम न करणे, खडखड आवाज, रस्त्यात बंद पडणे अशा विविध समस्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा या सेवेवर विश्वास बसला नाही.
‘हा’ निर्णयच बदलून टाकणार एसटीची ओळख2017 साली, तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात आणि अध्यक्षपदाच्या काळात मुंबई-रत्नागिरी मार्गावर शिवशाही बसची सुरूवात झाली होती. या नवीन वातानुकूलित सेवेची संकल्पना होती – सामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात थोडी अधिक आरामदायी सेवा उपलब्ध करून देणे.
मात्र या बस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्याने आणि खाजगी चालकांच्या गैरवर्तनामुळे सुरुवातीपासूनच टीकेचे धनी ठरल्या. अनेक चालक मद्यपान करून वाहन चालवतात, बस मध्येच थांबवून विश्रांती घेतात, प्रवासात अपघात होतात अशा तक्रारी सातत्याने येत राहिल्या.या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवशाही बस सेवा इतिहासजमा होणार असून, तीच बस आता नव्या रूपात हिरकणी किंवा लालपरी म्हणून प्रवाशांच्या सेवेत पन्हा रुजू होणार आहे.