
देवगड प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील मौजे गिर्ये येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त नूतन बुद्ध विहाराचे उद्घाटन आणि बुद्ध मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बौद्धजन विकास मंडळ, मुंबई व ग्रामीण पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित राहून बौद्ध बांधवांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, या बुद्ध विहाराला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असून, नव्याने बांधलेल्या विहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यावर आधारित शिल्पांचे लोकार्पणही करण्यात आले.
कार्यक्रमाला राज्याचे मंत्री नितेश राणे, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, विविध पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.