
सातारा प्रतिनिधी
सातारा शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट दरम्यानचा रस्ता लवकरच हायटेक आणि सौंदर्यपूर्ण स्वरूपात नागरिकांसमोर येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय रस्ता निधी (सीआरएफ) अंतर्गत या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, मध्यभागी डिव्हायडर, आकर्षक फुटपाथ, सायकल ट्रॅक, बाजूला बाग-बगीचे, बंदिस्त गटारे आणि सुटसुटीत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत या संपूर्ण आराखड्याची सविस्तर माहिती व्हिडीओ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देण्यात आली.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहुल अहिरे, प्रशांत खैरमोडे आणि आर्किटेक्ट प्रसन्न देसाई आदी उपस्थित होते.
“सातारा हे ऐतिहासिक महत्त्व असलेले शहर आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करताना पर्यटनवृद्धीकडे लक्ष द्या. प्रत्येक काम उच्च दर्जाचे असावे आणि हा रस्ता शहरातील सर्वात सुंदर रस्ता व्हावा,” अशा स्पष्ट सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, पोवई नाका ते वाढे फाटा दरम्यानच्या कूपर कॉलनी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून दुतर्फा वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचाही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
सातारा शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.