
सातारा प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य प्रांगणात अभिवादन सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
अभिवादनानंतर झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील गुणवंत शाखा, शिक्षक आणि खेळाडूंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कर्मवीर पारितोषिक विभागात विद्यार्थ्यांची संख्या आणि विभागनिहाय निवड करण्यात आली. यात अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, कोळाईदेवी विद्यालय, चंद्रभागा बाबुराव तुपे कन्या विद्यालय यांसह अनेक विद्यालयांचा समावेश होता. रायगड व इंग्लिश मिडियम विभागातील निवडक शाळांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.
यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ. विजय कुंभार (धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा) व श्री. प्रशांत खंडागळे (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, सारोळा कासार) यांना प्रदान करण्यात आला.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव झाला. ओजस देवळे (धनुर्विद्या), संस्कृती मोरे (बुद्धिबळ), पृथ्वीराज पाटील (रम्बी), अन्नपूर्णा कांबळे व अफ्रिद आतार (पॅरा जलतरण) यांचा यात समावेश होता.
कर्मवीर पारितोषिक महाविद्यालय विभागात 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शाखा – सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड आणि 1500 पेक्षा कमी विद्यार्थ्यांची शाखा – डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मवीरांचे कार्य व विचार यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या सामाजिक परिवर्तनासाठीच्या कार्याची आठवण उपस्थित मान्यवरांनी बोलताना करून दिली.
या प्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार शशिकांत शिंदे, दिलीप वळसे पाटील, रोहित पवार, चेतन तुपे, बाबासाहेब देशमुख, आशुतोष काळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार सुनील भुसारा, चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक अनिल पाटील, उपाध्यक्ष अरुण कडूपाटील, ॲड. राम काणगे आदी मान्यवर उपस्थित होते.