
मुंबई प्रतिनिधी
मुंबईसह उपनगरांमध्ये सध्या तुफान पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे वादळी वाऱ्यांसह पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी झाडं पडून नुकसान झाल्याचंही सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना सुरु आहे. या सामन्यालाही वादळी वाऱ्यांमुळं फटका बसला पावसामुळे दोन वेळा सामना थांबवावा लागला.
मुंबई पूर्व अन् उपनगरांमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार विजांचा कडकडाटही सर्वत्र सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर धुळीचं वातावरण असल्याचंही सांगितलं जात आहे. भांडुपमधील काही विभागात बत्तिगुल झाली आहे. पण दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळं काहीसा दिलासा मिळाला आहे.
तर वसई आणि बोरिवलीत रस्त्याच्या बाजुचे होर्डिंग कोसळल्याची माहिती आहे. वसईत एका दुकानावर होर्डिंग कोसळलं यावेळी मोठा आवाज झाल्यानं भीतीनं नागरिकांची पळापळ झाली. पण यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसंच कल्याण भिवंडी, कांदवली भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दहिसर भागातही सध्या हलका पाऊस सुरु आहे.
दरम्यान, लोकल ट्रेनची हर्बर लाईन तुफान पावसामुळं ठप्प झाली आहे. कुर्ला हार्बर मार्गावरील सीएसएमटीकडं जाणारी रेल्वे लाईन विस्कळीत झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर उभ्या असलेल्या रेल्वेच्यावर असलेल्या पेंटाग्राम मध्ये शॉर्टसर्किटमुळं या मार्गावर परिणाम झाला आहे.