
मुंबई प्रतिनिधी
मुंबई आणि ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्याला काहीसा ब्रेक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी करत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवार (६ मे) आणि बुधवार (७ मे) या दोन दिवसांत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पावसासोबतच या काळात वादळी वाऱ्यांचा आणि विजांच्या कडकडाटाचाही सामना करावा लागू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.
या चारही जिल्ह्यांमध्ये या काळात कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सियस, तर किमान तापमानदेखील ३३ अंश सेल्सियसच्या आसपास राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.