
सातारा प्रतिनिधी
शहरात नशेच्या इंजेक्शन विक्रीच्या रॅकेटचा सातारा शहर पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला एका तरुणाला अटक केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासात शिकावू डॉक्टरसह आणखी तिघांना अटक केली. न्यायालयाने या चौघांनाही 6 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील चारभिंती परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी शिवराज पंकज कणसे (वय 25, रा. हिलटॉप सोसायटी, याला संशयावरून ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे ‘मेफेंटरमाईन’ हे नशेचे इंजेक्शन आढळले. कणसेकडून सुमारे 11 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
प्राथमिक तपासात कणसे हा रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चौकशीतून साईकुमार महादेव बनसोडे (वय 25, रा. भोसे, ता. पंढरपूर), सुदीप संजय मेंगळे (वय 19, रा. सदरबझार, सातारा) आणि अतुल विलास ठोंबरे (वय 20, रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) यांची नावे पुढे आली. विशेष म्हणजे यातील साईकुमार बनसोडे हा वैद्यकीय शिक्षण घेत असलेला शिकावू डॉक्टर आहे.
या कारवाईत पोनि राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शाम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, सुजीत मोरे, पंकज मोहिते, निलेश जाधव, विक्रम माने यांनी सहभाग घेतला.
पोलिसांच्या सुत्रांनुसार हे इंजेक्शन 1 ते 3 हजार रुपयांना विकले जात होते. त्याचा नशेचा प्रभाव 6 ते 15 तासांपर्यंत टिकतो. यामुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर या आहारी जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
या रॅकेटमधून आणखी काही जणांचा सहभाग उघड होण्याची शक्यता असून इंजेक्शनचा साठा नेमका कुठून येतो, याचा तपासही पोलिस करत आहेत.