
मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त प्रकाश मोठे यांची आज शिवसेना (शिंदे गट) चे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी सदिच्छा भेट घेतली. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि विलेपार्ले परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
अमृत नगर, ज्ञानेश्वर नगर आणि खेर नगर या भागांतील गढूळ पाण्याच्या गंभीर समस्येकडे सरमळकर यांनी उपआयुक्तांचे लक्ष वेधले. स्थानिक नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्यानंतर या प्रश्नावर त्वरित उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात लेखी निवेदनही उपआयुक्तांना सादर करण्यात आले.
उपआयुक्त प्रकाश मोठे यांनी समस्या गांभीर्याने घेत तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले असून, संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस विलेपार्ले विधानसभा अध्यक्ष सुभाष कांता सावंत, वांद्रे विधानसभा अध्यक्ष कैलास येरुंकर आणि वांद्रे पश्चिम महिला विभाग प्रमुख शितल मात्रे, तसेच वांद्रे विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.