
उमेश गायगवळे (पत्रकार) मो,9769020286
संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी स्वातंत्र्योत्तर भारतातील एक महत्त्वाची लोकचळवळ होती. ज्यामुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या चळवळीत अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, लेखक आणि शाहिरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आजही आपल्याला प्रेरणा देतो.
१ मे. एकाच दोन वेगवेगळे पण अतिशय अर्थपूर्ण दिवस आपल्याला स्मरण करतात — महाराष्ट्राची राज्यरचना आणि जागतिक कामगार दिन. एकीकडे अस्मितेच्या लढ्यातून जन्म घेतलेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीची आठवण, तर दुसरीकडे कामगार हक्कांच्या जागृतीची जागतिक साक्ष.
महाराष्ट्र दिन म्हणजे भाषिक अस्मितेचा विजय. १९५० च्या दशकात ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ ही मागणी केवळ राजकीय नव्हती, तर ती सामाजिक व सांस्कृतिक आत्मसन्मानाची मागणी होती. या चळवळीत कामगार संघटनांचं योगदान फार मोठं होतं. गिरणी, रेल्वे, पोर्ट, कापड मिल्समधील कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळेला शक्ती दिली. त्यांच्या मोर्च्यांनी आणि आंदोलनांनी ‘मुंबई महाराष्ट्राची’ ही हाक बुलंद केली.
दुसरीकडे, १ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस फक्त कामगारांचा नाही, तर सगळ्याच मेहनती लोकांचा आहे. शिकागोमध्ये १८८६ मध्ये ८ तासांच्या कामकाजासाठी सुरू झालेला लढा आजही कित्येक देशांमध्ये समान हक्कांच्या लढ्याचं प्रतीक आहे.
भारतात आणि महाराष्ट्रात डाँ बाबासाहेब आंबेडकर, एस. ए. डांगे, दत्ता इसवळकर आदी अनेक नेत्यांनी केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक समतेसाठी कामगार संघटनांना आकार दिला.
महाराष्ट्रात गिरणी कामगारांचा लढा हा फक्त पगाराच्या वाढीसाठी नव्हता, तर तो त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईचा भाग होता. उद्योगांच्या नव्या धोरणांमुळे रोजगाराचे स्वरूप बदलत असतानाही, कामगार हा अजूनही उत्पादन प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे, हे विसरता कामा नये.
गिरणी कामगारांच्या न्यायहक्कासाठीचा संघर्ष: एक ऐतिहासिक लढा,
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी तिच्या औद्योगिक इतिहासात कामगारांच्या संघर्षांनी महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे. विशेषतः गिरणी कामगारांचा लढा हा भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासातील एक क्रांतिकारी पर्व ठरला आहे. या लढ्याचे नेतृत्व करण्याचे श्रेय अनेक तळमळीच्या नेत्यांना जाते, मात्र डॉ. दत्ता सामंत यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
डॉ. दत्ता सामंत: कामगारांचा बुलंद आवाज,
१९८० आणि ९०च्या दशकात कामगारांच्या हक्कांसाठी मुंबईत जे मोठे आंदोलन उभे राहिले, त्याचे प्रमुख शिल्पकार होते डॉ. दत्ता सामंत. त्यांनी हजारो कामगारांचे नेतृत्व करत गिरणी मालकांविरोधात आणि व्यवस्थेविरोधात सशक्त संघर्ष केला. त्यांचा ठाम आणि ज्वलंत स्वभाव, स्पष्ट विचारसरणी आणि निर्भीड नेतृत्व यामुळे ते लवकरच कामगारांचे श्रद्धास्थान बनले.
गिरणी कामगारांचा संघर्ष
मुंबईतील गिरण्या हे शहराचे औद्योगिक हृदय होते. पण हळूहळू गिरण्यांमध्ये कामगारांना कमी वेतन, जास्त कामाचे तास, आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत काम करावे लागत होते. त्याविरोधात आवाज उठवण्याची गरज होती. या पार्श्वभूमीवर १८ जानेवारी १९८२ रोजी मुंबईतील सुमारे २.५ लाख गिरणी कामगारांनी संप पुकारला. हा संप अनेक महिन्यांपर्यंत चालला.
डॉ. दत्ता सामंत यांनी कामगारांच्या बाजूने निडरपणे उभे राहत सरकार आणि गिरणी मालकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांची मुख्य मागणी होती – कामगारांना न्याय्य वेतन, चांगल्या सुविधा, आणि गिरण्या बंद करू नयेत याची हमी.
संघर्षाची परिणीती
संपाला अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक गिरण्या कायमस्वरूपी बंद पडल्या. मात्र या आंदोलनामुळे देशभरात कामगार चळवळीला एक नवा चेहरा मिळाला. व्यवस्थेला धक्का देणारा हा लढा होता. कामगारांच्या हक्कांचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला. डॉ. दत्ता सामंत यांची लोकप्रियता एवढी वाढली की त्यांनी पुढे लोकसभा निवडणूकही जिंकली.
संघर्षाचे परिणाम आणि आजचे चित्र
या लढ्यामुळे कामगार संघटनांचा विचार, संघटनांची रचना, आणि कामगार हक्कांची व्याख्या बदलली. हा लढा अपूर्ण राहिला असला, तरी त्यातून उठलेला आवाज आजही कामगार हक्कांच्या चळवळीत प्रेरणादायक आहे.
आज गिरण्या नाहीत, त्यांच्या जागी उंच टॉवर आणि मॉल्स उभे आहेत. पण त्या इमारतींच्या सावलीत अजूनही कोणी सांगतं – “कधीकाळी इथे शिट्ट्या व्हायच्या, गिरण्या चालायच्या, आणि हक्कासाठी रणभेरी वाजायची.”
आजच्या दिवसाचे महत्त्व या पलीकडे आहे. महाराष्ट्र हे केवळ एक भौगोलिक राज्य नाही — ते चळवळींचा, प्रबोधनाचा आणि समतेसाठीच्या झगड्याचं प्रतीक आहे. याच राज्यात लोकशाहीचा झेंडा उंच ठेवणाऱ्या कामगार चळवळी घडल्या. त्यामुळे १ मे हा दिवस फक्त उत्सव साजरा करण्यासाठी नव्हे, तर आत्मपरीक्षण, नव्या ध्येयांची निर्धार आणि सामाजिक न्यायासाठीच्या प्रयत्नांची नवी दिशा ठरावी.
सत्ताधारी, उद्योगपती, संघटनांचे नेते आणि सामान्य नागरिक प्रत्येकाने हा दिवस केवळ स्मरणरूपाने नव्हे, तर कृतीरूपात साजरा करावा. कामगारांच्या हक्कांचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरव, या दोन्ही गोष्टींचा सन्मान केल्याशिवाय आजचा दिवस पूर्ण होणार नाही…