
सातारा प्रतिनिधी
राज्यभरात अपघाताचे सत्र सुरू असताना असाच एक भीषण अपघात सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला आहे. कराड शहरातील कृष्णा नाका येथे भरधाव चारचाकी इको गाडीने ९ ते १० वाहनांना आणि तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उडवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
संजय पवार असं चालकाचं नाव असून एअर बॅग उघडल्याने चालक बालंबाल बचावला आहे. मात्र, कारमध्ये असेलेली महिला जखमी झालीय. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांना उडवल्यानंतर जवळपास २ किलोमीटर अंतरावर वाहनांना धडक देत ही कार पलटी झाली. दरम्यान, या भीषण अपघातात वाहनाचा चक्काचूर झालेला असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमलेली होती.
दरम्यान, असाच काहीसा अपघात सातारा जिल्ह्यातील सर्कलवाडी या गावात घडला आहे. एका मद्यधुंद पोलीसाने भरधाव वेगाने कार चालवत अंगणात झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. रमेश लक्ष्मण संकपाळ (वय ५५) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भुईंज पोलिस स्टेशनला असलेली नाईट ड्युटी संपवून हवालदार ज्ञानेश्वर बाबुराव राजे (रा. वाघोली, ता. कोरेगाव) हे त्यांच्या कारमधून घरी निघाले होते. दरम्यान पहाटे सव्वा तीन वाजता सर्कलवाडीत आल्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
रात्रीच्या अंधारात भरधाव वेगाने गाडी चालवत ज्ञानेश्वर राजे मार्गस्थ झाले होते. मात्र ते ड्युटी आटोपून गाडी चालवत असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असल्याने घराच्या दिशेने भरधाव वेगाने गेली. दरम्यान पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर राजे हे दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर सदर पोलीस कर्मचाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे.