श्रीनगर वृत्तसंस्था
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने देशभरात संताप उसळला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा समावेश आहे.
मात्र, या काळजाला चटका लावणाऱ्या घटनेत काही पर्यटक केवळ क्षणांच्या फरकामुळे मृत्यूच्या छायेतून थोडक्यात बचावले.
अमरावतीचे 11 पर्यटक त्या दिवशी बैसरनच्या हिरवळीवर आनंदाने फिरत होते. त्यांचं हास्य, फोटो काढणं आणि पर्यटनाचा उत्साह काही क्षणातच भयकंर आठवणीत बदलणार होता. पण नशीब बलवत्तर ठरलं आणि हे सर्वजण हल्ल्याच्या काही मिनिटं आधीच तिथून निघाले. श्रीनगरमध्ये पोहचून त्यांनी जीव वाचवला. या पर्यटकांमध्ये बोडके, देशमुख, उमेकर आणि लांडे कुटुंबीयांचा समावेश होता.
पंढरपूरहून आलेल्या जवळपास ५० पर्यटकांनी हल्ल्याच्या बातमीने धस्स होत पुढचा प्रवास रद्द केला. पहलगामच्या अगदी उंबरठ्यावर असतानाच हल्ला झाल्याने त्यांनी परतीचा मार्ग धरला.
सांगलीतील डॉ. विठ्ठल पालांदे हे कुटुंबासह हल्ल्याच्या ठिकाणी हल्ल्याच्या तीन तास आधीच फोटो काढून पुढे निघाले होते. त्यांच्या छायाचित्रणाच्या छंदामुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव वाचला.
जळगावच्या किशोरी वाघुळदे व त्यांच्या मैत्रिणी रेणुका भोगे याही हल्ल्यापासून थोडक्यात बचावल्या. त्यांनी क्षितीज ट्रॅव्हल्ससह सहल केली होती. सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे सर्व महिला सुखरूप बचावल्या असून त्यांनी पहाटे कटारा गाठला आहे.
या हल्ल्यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी; पुण्याचे संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे आणि पनवेलचे दिलीप देसले यांचा मृत्यू झाला. तर एस. बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हे जखमी झाले आहेत.
दहशतवाद्यांनी पोलीस वेशात येऊन पर्यटकांचा धर्म विचारत गोळ्या झाडल्या. हा पुलवामा नंतरचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. यामुळे देशभरातून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.


