
मुंबई प्रतिनिधी
मुंबई, विक्रोळी पूर्व येथील बाबा मटन शॉप जवळ राहणाऱ्या ३७ वर्षीय सुनम सुरजलाल या महिलेचा अज्ञात इसमाने गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २१ एप्रिलच्या रात्री घडली असून, अवघ्या ८ तासांत पोलिसांनी तांत्रिक आणि मानवी यंत्रणांचा वापर करून २५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
विक्रोळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक १९६/२०२५ भारतीय दंड विधानाच्या कलम १०३(१), ३३३ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. मृत महिलेचे पती सुरजलाल माताफेर (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात तरुणाने त्यांच्या घरात घुसून धारदार हत्याराने खून केला.
गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन, डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. पंचासमक्ष तपास करून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हनासा सफीक शहा (वय २५) या तरुणाला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या तपासात रात्रपाळीचे पोलीस निरीक्षक कांबळे, उपनिरीक्षक विठ्ठल गायकवाड व त्यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
पोलिसांनी आरोपीविरोधात अधिक तपास सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे.