
मुंबई प्रतिनिधी
चुनाभट्टी पोलिसांनी ड्रग्स माफिया टोळीवर मोठी कारवाई करत १० कोटी रुपयांच्या चरससह दोन तरुणांना अटक केली आहे. या दोघांकडून एकूण १० किलो ५३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव रहीम मजीद शेख (३०) असून तो गुजरातमधील वलसाड येथील रहिवासी आहे.
परिमंडळ ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चुनाभट्टी पोलीस गस्त घालत असताना एक तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून १ किलो ९०७ ग्रॅम चरस आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत अंदाजे १ कोटी ९० लाख रुपये आहे.
सखोल चौकशीत आरोपीने कबुली दिली की, आणखी चरस त्याच्या मूळगावी वलसाड (गुजरात) येथे ठेवले आहे. त्यावरून चुनाभट्टी पोलिसांचे पथक तात्काळ गुजरातला रवाना झाले आणि तेथे नितीन शांतिलाल तंडेल (३२) या दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ८ किलो १४६ ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले. एकूण जप्त चरसची किंमत सुमारे १० कोटी ५३ हजार रुपये इतकी आहे.
या कारवाईदरम्यान, पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सदर कारवाई पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात पोलिस निरीक्षक राजू ठुबल, एपीआय मैत्रानंद खंदारे, पीएसआय सुदर्शन ढोबले तसेच पोलिस शिपाई नितेश विचारे, सतीश शेलकंदे, अमोल सरडे, अमोल यमगर, राउत, सानप आणि मालवे यांचा समावेश होता.
या यशस्वी कारवाईबद्दल अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील आणि पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी चुनाभट्टी पोलिस पथकाचे विशेष कौतुक केले आहे.