
कराड प्रतिनिधी
मोटर सायकल असो किंवा चार चाकी गाडी असो महिलांना कसरत करावी लागते. काही महिला सरावाने सराईतपणे अवजड वाहने चालवतात, तरीही मनात धाकधूक असतेच. मात्र, कराड तालुक्यातील नांदगाव येथील ६५ वर्षीय आजी चक्क गर्दीतूनही बुंगाट रिक्षा चालवतात कसलीही भीती न बाळगता या आजी सराईतपणे रिक्षा चालवताना पाहून भल्या भल्यांच्या भुवया उंचावत आहेत.
मंगला आवळे यांचे पती मुले लहान असतानाच हे जग सोडून गेले, तेव्हापासून त्या मोलमजुरी करून तीन मुली आणि एका मुलगा असा चार मुलांचा सांभाळ करत होत्या. मुलगा मोठा होऊन एसटीमध्ये चालक म्हणून काम करत आहे. मुलींची लग्न झाली असून मुलाचाही संसार चौकोनी झाला आहे त्या मुलाच्या संसाराला हातभार लावावा स्वतःच्या औषध पाण्याचा खर्च निघावा या उद्देशाने सुरुवातीपासूनच कष्टात आयुष्य घालवलेल्या मंगला आवळे या आजीने मुलाकडून रिक्षा शिकून घेऊन रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
वय 65 वर्ष आणि शुगरचा त्रास असणाऱ्या या आजीने पंधरा दिवसापासून रिक्षा हातात घेतली आणि पंधरा दिवसातच त्या गर्दीतूनही बुंगाट रिक्षा चालवू लागल्या आहेत त्यांच्या मुलाने त्यांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. आपल्या मुलाच्या संसाराला हातभार लागावा तसेच आपली आवड ही जोपासता यावी यासाठी या आजीने हे धाडस केलं आहे.
कराडमधून रिक्षा चालवताना वाहतूक कोंडीचा सामना नित्यनेमाने करावा लागतो. मात्र, असं असतानाही नांदगावच्या मंगल आबा आवळे या ६५ वर्षीय आजी अगदी गर्दीतूनही सराईतपणे रिक्षा चालवतात त्यांच्या या धाडसाला मनापासून प्रत्येकजण सलाम करत आहे.
कराड उंडाळे या मार्गावर आजी प्रवासी वाहतूक करतात त्यांच्या रिक्षात प्रवासीही बिनधास्त बसत असून सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत त्या परीक्षा चालवतात खर्च वजा जातात त्यांना दररोज 500 700 रुपये मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.