
मुंबई प्रतिनिधी
आज दुपारी सुमारे १२:३० वाजता बांद्रा पोलिस स्टेशनजवळ एक हृदयद्रावक अपघात घडला. डंपर एका मोटारसायकलस्वाराला जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव दिनेश भंवरलाल जैन (वय ४५) असे असून ते सांताक्रूज येथील रहिवासी आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी रस्त्याचे काम सुरु होते आणि रस्त्याच्या मधोमध मोठमोठे दगड ठेवलेले होते. त्या अडथळ्यांमुळे जैन यांची मोटारसायकल घसरून ते खाली पडले आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांना चिरडले. तातडीने त्यांना जवळील बाबा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघाता प्रकरण मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी बांद्रा पोलिसांकडे रस्त्याच्या कामासाठी जबाबदार असलेल्या ठेकेदार व डंपर चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.