
मुंबई प्रतिनिधी
वाहने चालकांकडून उच्च सुरक्षा नंबर प्लेट (HSRP) मिळवण्यासाठी बनावट वेबसाइट तयार करून पैसे उकळणाऱ्या टोळीचा सायबर पोलीस ठाणे, गुन्हे विभाग, दक्षिण विभाग, मुंबई यांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात गुन्ह्यातील मुख्य आरोपीस गजाआड करण्यात आले असून, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई २ एप्रिल २०२५ रोजी परिवहन आयुक्त गजानन नाना टोंबरे यांच्या फियाटनंतर करण्यात आली. नागरिकांनी HSRP साठी अधिकृत वेबसाइटऐवजी बनावट वेबसाइट https://indnumberplate.com वरून नंबर प्लेट बुकिंग केल्याचे निदर्शनास आले. परिणामी अनेकांची फसवणूक झाली.
Maharashtra Transport च्या अधिकृत वेबसाइटवर
https://transport.maharashtra.gov.in या पोर्टलवरून HSRP साठी बुकिंग करता येते. बनावट वेबसाइटवरून लोकांकडून पैसे घेतले जात असून, यामागे असलेली सायबर गुन्हेगारी टोळीचा शोध घेऊन आरोपीस सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, दक्षिण विभाग, मुंबई यांनी अटक केली आहे.
या प्रकरणी गुन्हा ११ एप्रिल २०२५ रोजी नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा तपास केला असता या वेबसाईटद्वारे अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सावधगिरीचा इशारा
नागरिकांनी कोणतीही सेवा घेण्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाइटचाच वापर करावा, अशा सूचना परिवहन विभाग व पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. बनावट वेबसाईट्सवर विश्वास ठेवू नये, आणि कोणत्याही शंकास्पद लिंकवर क्लिक करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.