
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सायबर सुरक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. त्यांनी मोबाईल फॉरेन्सिक युनिट व्हॅन, मोबाईल व्हिक्टिम स्पॉट युनिट व्हॅन आणि अत्याधुनिक पोलिस दुचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे गुन्ह्याच्या ठिकाणी अधिक जलद आणि अचूक तपास करण्याची प्रक्रिया सक्षम करणे. मोबाईल फॉरेन्सिक युनिट व्हॅनद्वारे घटनास्थळी प्राथमिक फॉरेन्सिक तपासणी शक्य होईल, तर मोबाईल व्हिक्टिम स्पॉट युनिटद्वारे पीडितांना तातडीने मदत करता येईल. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज पोलिस दुचाकी वाहने वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन प्रसंगी त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी उपयुक्त ठरतील.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री योगेश कदम, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन् भारती तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या पुढाकारामुळे महाराष्ट्र पोलिसांची कार्यक्षमता अधिक वाढेल आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक मजबूत पायाभूत सुविधा निर्माण होईल.