
सोलापूर प्रतिनिधी
मद्यपानासाठी राज्य उत्पादन शुल्क एक दिवसीय, एक वर्षासाठी व आजीवन परवाना दिला जातो. परवान्याशिवाय दारू खरेदी, बाळगणे व मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई होते. याशिवाय ढाबे-हॉटेलवर मद्यविक्री किंवा मद्यपान करणाऱ्यांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले जाते.
त्याठिकाणी मद्यपीसह एक ते तीन हजारापर्यंत तर ढाबा-हॉटेल चालक किंवा मालकास पाच ते ३० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्या उत्पादन शुल्क विभागाने २०२४-२५ या वर्षात २७७ ढाब्यांवर कारवाई केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात गोवा, कर्नाटकातून विदेशी दारूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. याशिवाय हॉटेल-ढाब्यांवर विशेषत: महामार्गांवरील हॉटेल-ढाब्यांवर बिनधास्तपणे मद्यविक्री होते आणि हजारो वाहन चालक त्याठिकाणी मद्यपान करतात. परमीट रुमशिवाय अन्य ठिकाणच्या मद्यपानास बंदी असून बिअरशॉपी, वाइन शॉपमधूनच मद्यविक्री अपेक्षित आहे. अनेक हॉटेल-ढाबा चालक तेथून दारू आणतात आणि हॉटेलवर जेवायला आलेल्यांची मद्यपानाची सोय करून देतात. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत ‘एक्साईज’ विभागाची ढाब्यांवरील कारवाई २३ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते.
…तर संबंधितांवर दाखल होईल गुन्हा
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात ढाबे, हॉटेलवर अवैध मद्यपान करणाऱ्या मद्यपींसह परवानगी नसताना मद्य विक्री करणारे हॉटेल-ढाबा मालक, अशा २७७ जणांवर कारवाई केली आहे. त्यांना न्यायालयाने एकूण दहा लाखांहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे. परमीट रुमशिवाय कोणत्याही ठिकाणी विनापरवाना मद्यपान करता येत नाही, तसे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते.