
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या मेसेजने खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर यांची 1 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती.
विशेष म्हणजे फेसबुक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांची हत्या करुन आरोपीने स्वत:देखील आपलं जीवन संपवलं होतं. या घटनेनं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता, अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करत धमकी देण्यात आली आहे. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा हा मेसेज आहे. त्यामुळे, लालचंद हे अभिषेक घोसळकर हत्याप्रकरणातील साक्षीदार आहेत. त्यामुळे, तेजस्वी घोसाळकर यांनी याबाबत पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. लालचंद पाल यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल व तेजस्वी यांना व्हॉटसअप ग्रूपवरुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लालचंद पाल हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक असून अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्युसमयी ते घटनास्थळी होते. त्यामुळे, या खूनप्रकरणात ते प्रमुख साक्षीदार आहेत. त्यातच, आता गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवर एका सदस्याने लालचंद व तेजस्वी यांना ठार मारण्याबाबतचा संदेश पोस्ट केल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.
1 एप्रिल रोजी व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज
लालचंद पाल यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, मी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचा कार्याकर्ता असून सध्या मी शिवसेना शाखा क्रमांक .01, गणपत पाटील नगर या ठिकाणी कार्यालय प्रमूख म्हणून काम पाहात आहे. मी दिवंगत शिवसेना नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांच्या सोबत काम करीत होतो. 08 फेब्रुवारी 2024 रोजी अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली तेव्हा मी त्यांचेसोबत होतो व सदरचे गुन्ह्यात मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून जबाब नोंदवलेला आहे. मात्र, त्याच अनुषंगाने 02 एप्रिल 2025 रोजी मला माझा मित्र रियाज याने सांगितले की, 1 एप्रिल 2025 रोजी गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज आल्याची माहिती दिली.
मित्रानेच दिली माहिती
रियाज हा सदर व्हॉट्सअपचा सदस्य असल्याने त्याने हा ग्रुपवरील मेसेज पाहिला. त्यामध्ये, शरीफ नावाच्या व्यक्तीने दिवंगत अभिषेक विनोद घोसाळकर यांचा फोटो टाकून त्याखाली इंग्रजीमध्ये Lalchand inko Dekhkar Sudhar Ja, Isko biwi ko mat marva dena Lalchand” असा मजकूर लिहून मला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे मला सांगितले, अशी फिर्याद लालचंद पाल यांनी दिली आहे.
ग्रुपमध्ये मेसेज काय?
दरम्यान, मोहम्मद हबीब वलीउल्ला सुलेमानी (वय 33 वर्षे) व आबीद कासीम शेख, वय 30 वर्षे हे गरीब नियाज कमिटी या व्हॉट्सअप मोबाईल ग्रूपचे अॅडमीन आहेत. तसेच सदरचे मॅसेज हे नंतर ग्रुप मधून डीलीट केलेले आहेत. तरी शरीफने गरीब नवाज वॉटसअप ग्रुपवर अभिषेक घोसाळकर यांचा फोटो टाकून त्याखाली इंग्रजीमध्ये Lalchand inko Dekhkar Sudhar Ja, Isko biwi ko mat marva dena Lalchand असा मजकूर लिहून मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून माझी नमूद इसमाविरूदध कायदेशिर फिर्याद आहे, असे लालचंद पाल यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.