
कराड प्रतिनिधी
उंब्रज येथील गोडवाडी रोडवरून २ वाजण्याच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील १ तोळा वजनाचे, सुमारे ६०,००० रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओरबाडून चोरी केल्याची घटना घडली. आरोपीने मोटारसायकलवरून महिलेचा विश्वास संपादन करून तिला सोडण्याच्या बहाण्याने थांबवले आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाला निर्देश दिले.
आरोपीचे नाव संभाजी गोविंद जाधव (वय ३८, रा. सांगली रोड, चंद्रसेन नगर, विटा, ता. खानापूर, जि. सातारा) असे असून, चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले १ तोळा वजनाचे मंगळसूत्र (६०,००० रुपये) आणि कराड येथून चोरी केलेली २५,००० रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ८५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस तपासात आरोपीच्या विरोधात यापूर्वी विटा, कराड शहर, म्हसवड, शिरोळ (जि. कोल्हापूर) आणि कवठेमहाकाळ (जि. सांगली) येथे घरफोडी, चोरी आणि एटीएम बदलून रोख रक्कम लंपास करण्याचे एकूण ६ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तो जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करत होता.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, पोलीस नाईक रोहित थोरवे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात, श्रीधर माने, निलेश पवार, मधुकर मांडवे, राजकुमार कोळी आणि हेमंत पाटील यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर करीत आहेत.