
मुंबई प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कवितेतून अपशब्दाचा वापर केल्याने वादात अडकलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा मिळाला आहे. मद्रास हायकोर्टाने त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला करत 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील खार पोलिस ठाण्यात कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो तमिळनाडू किंवा पुद्दुचेरीमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. आपल्या जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने तातडीने दिलासा मिळावा, अशी याचिका त्याने मद्रास हायकोर्टात दाखल केली होती.
चौकशीला हजर राहणार
अंतरिम मंजूर झाल्यानंतर आता कुणाल कामरा चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार आहे. त्याने 31 मार्च हजर राहणार असल्याचे पोलिसांना कळवल्याचे समजते. यापूर्वी कामराला पोलिसांनी दोनदा समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. पण कामराने आठवडाभराचा वेळ मागितला होता. पोलिसांना त्याला वेळ देण्यास नकार दिल्याने त्याने मद्रास हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली.
कामराला जामीन देताना कोर्टाने म्हटले की, कामरा महाराष्ट्रातील कोर्टापर्यंत याचिका दाखल करण्यासाठी पोहचू शकत नाही, असे सध्या दिसते. त्यामुळे त्यांना अंतरिम जामीन देण्याच्या निर्णयापर्यंत कोर्ट आल्याचे आदेशात म्हटले आहे. कामरा हा मुळचा तमिळनाडूचा आहे. त्यामुळे त्याने मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टानेही तातडीने या याचिकेची दखल घेतली.
दरम्यान, कामराने ‘नया भारत’ या व्हिडीओतून एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्याविषयी गद्दार हा शब्द वापरण्यात आल्याने शिवसैनिक चांगलेच भडकले आहेत. त्याने ज्या स्टुडिओमध्ये व्हिडीओ शुट केला होता, तिथे शिवसैनिकांनी मोठी तोडफोड केली होती. तसेच राज्यभरातील नेते, पदाधिकाऱ्यांकडून कामराला धडा शिकवणार, ठोकून काढणार अशा अनेक धमक्या दिल्या होत्या.