
मुंबई प्रतिनिधी
बस चालवत असताना मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणे कंपनीच्या चालकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. बस चालवत असताना मोबाइलवर मॅच पाहिल्याने एसटी प्रशासनाने त्याला बडतर्फ केले असून संबंधित खासगी कंपनीला पाच हजार रुपये एवढा दंड ठोठावला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने ही कारवाई केली.
ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खासगी ई-शिवनेरी बसमधील चालक 21 मार्च रोजी रात्री लोणावळ्याजवळ बस चालवताना क्रिकेट मॅच पाहत होता. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याचे चित्रिकरण केले आणि ते थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खासगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहन चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले. तसेच संबंधित खाजगी संस्थेला 5000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
यावेळी सरनाईक म्हणाले की, ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करत असतात. अपघातविरहित सेवा हा या बस सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करून प्रवाशांचा एसटीच्या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ करणे जास्त महत्त्वाचे आहे. भविष्यात एसटीकडे असलेल्या खासगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात नोव्हेंबर 2023 पासून एसटी बस चालकांना मोबाइल बंदी करण्यात आली आहे. मात्र, या आदेशाचे काटोकोरपणे पालन होत नसल्याचे सातत्याने समोर येणाऱ्या घटनांमधून दिसते.
एसटी चालकांनी स्थानक-आगारातून बस सुरू करण्यापूर्वी आपला मोबाइल वाहकाकडे जमा करणे बंधनकारक आहे. विनावाहक सेवा देणाऱ्या एसटीत चालकांनी मोबाइल आपल्या बॅगेत ठेवावा. मोबाईलसह ब्ल्यूटूथ, इयरबड्, हेडफोन आणि अन्य तंत्रज्ञानाच्या वापरावरही महामंडळाने पूर्णपणे बंद घातलेली आहे.
एसटी बस चालवाताना मोबाइलवर बोलणे, व्हिडीओ पाहणे, मोबाइवर गाणी लावून ऐकणे यांमुळे चालकांची एकाग्रता भंग होते. एसटीमधून सुरक्षित वाहतूक सेवा दिली जाते. यामुळे चालकांनी वाहन चालनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. बस चालवताना एसटी चालक मोबाइलचा वापर करत असल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतात.