
नायगांव प्रतिनिधी
मुंबईत मराठी माणसाची गळचेपी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. आता अशीच एक घटना नायगावमध्ये घडली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महिलेने मेंटेनन्स भरला नसल्याने घरातील पाण्याचा पुरवठा बंद केल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी महिलेला नायगावमधील एका सोसायटीतील सेक्रेटरीने जातीवाचक शिवीगाळ केल्याने महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सेक्रेटरीने ‘मराठीला गोळी मारा’ असं मराठीचा अपमान करणारे वक्तव्यही केले आहे. नायगाव पूर्व येथील रोशन पार्क सोसायटीमध्ये राहणाऱ्या स्वीटी मांडवकर या महिलेने वसई पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
नायगाव पूर्व येथील रोशन पार्क सोसायटीत राहणाऱ्या स्वीटी नथुराम मांडवकर या महिलेने सोसायटीचे मेंटेनन्स भरले नसल्याने त्यांच्या घरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सेक्रेटरीकडे त्याची विचारणा करण्यासाठी गेल्यावर त्याने महिलेला ‘मराठीला गोळी मारा’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. तसेच महिलेला त्यांनी जातीवाचक शिवीगाळही केली आहे. स्वीटी नथुराम मांडवकर यांनी त्यांची डिलिव्हरी झाल्यामुळे तसेच घरात चोरी झाल्याने आर्थिक अडचणीमुळे सोसायटीचे मेंटेनन्स भरले नव्हते. त्यामुळे सोसायटीने त्यांचे पाणी बंद केले. या सोसायटीमध्ये 91 फ्लॅट्स असून अनेक जणांची थकबाकी राहिली आहे. तरीदेखील केवळ आपल्यावरच कारवाई करण्यात आल्याची तक्रार महिलेने केली आहे.
यासंदर्भात विचारणा करण्यासाठी त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्यांनी सेक्रेटरीला नोटीस मराठीत द्या, अशी मागणी केली. यावर सेक्रेटरीने संतापून ‘मराठीला गोळी मारा’ असे अपमानजनक वक्तव्य केले. याबाबत मांडवकर यांनी वसई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. सोसायटीतील काही सदस्य त्यांना मानसिक त्रास देत असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. सेक्रेटरीने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेत तुम्ही मराठी लोकांनी फ्लॅट विकून जा, नाहीतर तुमचा आम्ही मानसिक आणि शारीरिक छळ करू अशी धमकी दिली. कमिटीच्या सदस्यांकडून आपल्या घरातील लहाण मुलांवर जादूटोणा केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली मात्र कमिटीकडून ते दिले जात नसल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.