
मुंबई प्रतिनिधी
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) सर्व वाहनांसाठी शासनाने बंधनकारक केली आहे. यानुसार, २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. सध्या राज्यभरात या प्रक्रियेसाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे वाहनधारकांना नंबर प्लेट बदलण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
यासाठी ३० मार्च २०२५ ही डेडलाईन देण्यात आली होती. पण ही डेडलाईन संपायला केवळ दहाच दिवस शिल्लक असताना आता याला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनानं यासाठीचं परिपत्रक काढलं आहे.
मुदतवाढीवर शासनानचं म्हणणं काय?
यासंदर्भात राज्य शासनानं काढलेल्या परिपत्रकानुसार, राज्य शासनानं मुदतवाढ का देण्यात येत आहे? याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. परिपत्रकात म्हटलं की, १ एप्रिल २०२९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात HSRP नंबर प्लेट 31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याच काम फारच कमी झालं आहे. त्यामुळं जुन्या वाहनांना ही HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
या मुदतवाढीच्या अनुषंगानं सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. तसंच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावं, असं निर्देश या परिपत्रकातून देण्यात आले आहेत. २० मार्च २०२५ या तारखेनं हे मुदतवाढीचं परिपत्रक राज्य शासनानं काढलं आहे.
HSRP नंबर प्लेटचे फायदे काय?
HSRP नंबर प्लेट्स अशा पद्धतीनं बनवलेल्या असतात ज्यामध्ये कोणाला बदल करता येत नाही. बनावट पाटी बनवणं कठीण आहे. त्यामुळं वाहन चोरीपासून प्रतिबंध होतो.
HSRP नंबर प्लेट्स चोरीची वाहनं आणि बनावट नंबर प्लेट्स ओळखण्यात मदत करतात. त्यामुळं फसवणूक टाळता येते.
HSRP नंबर प्लेट्समुळं अपघाताला कारणीभूत ठरलेलं वाहनं आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणारं वाहनं ओळखण्यास मदत होते.
HSRP नंबर प्लेट्सची इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नोंदणी होते आणि तुमच्या वाहनाशी जोडल्या जातात. त्यामुळं वाहन कोणाच्या मालकीचं आहे हे लगेच शोधता येतं.
ही नंबर प्लेट तुम्हाला घरी बसवता येत नाही, कारण याला नट बोल्टचं फिटिंगला परवानगी नाही.
HSRP नंबर प्लेटची वैशिष्ट्ये?
होलोग्राम : अशोक चक्राची प्रतिमा असलेला हॉट-स्टॅम्प केलेला क्रोमियम-आधारित होलोग्राम
लेसर-एच्ड पिन: लेसर तंत्रज्ञान वापरून कायमस्वरूपी ओळख क्रमांक (पिन) कोरला जातो
छेडछाड-प्रूफ स्नॅप लॉक : नंबर प्लेट बसवताना पुन्हा वापरता न येणारा रिबीट लॉक वापरला ज्यामुळं नंबर प्लेट कोणालाही काढता येत नाही, फक्त लॉक तोडूनच ती काढली जाऊ शकते.
रिफ्लेक्टीव्ह शीटिंग: नंबर प्लेटवर रिफ्लेक्टीव्ह शीटिंग वापरण्यात आल्यानं अंधारातही तुमच्या वाहनाची नंबर प्लेट चमकते.