
मुंबई प्रतिनिधी
देशात घटस्फोटाचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. ‘कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर’ या नियतकालिकात यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
या अहवालात घटस्फोटांच्या कारणांचाही उल्लेख करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे देशात सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात होत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशातील एकूण घटस्फोटांपैकी १८.७ टक्के घटस्फोट महाराष्ट्रात होत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रव्यतिरिक्त कर्नाटकमध्ये ११.७ टक्के, पश्चिप.बंगाल ८.२ टक्के, दिल्ली ७.७ टक्के, तमिळनाडूत ७.१ टक्के, तेलंगणात ६.७ टक्के, केरळ ६.३ टक्के तर राजस्थानमध्ये २.५ घटस्फोटाची प्रकरणं नोंदवली जात आहेत. सर्वाधिक घटस्फोट २५ ते ३४ या वयोगटातील असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
घटस्फोटाची कारणं काय?
या अहवालानुसार, वाढत्या घटस्फोटांच्या कारणांमध्ये सोशल मीडिया हे मुख्य कारणांपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नातेसंबंधांवर खूप विपरित परिणाम होताना दिसतो आहे. याशिवाय व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे निर्माण होणारे तणाव, नोकरीमुळे जोडीदाराला देता न येणारा वेळ, महागाईतून होणारी आर्थिक कोंडी, जबाबदाऱ्यांमुळे नात्यातील ओलावा कमी होणे आणि वैवाहिक नातेसंबंधांबाबत संशयाचं वातावरण निर्माण होणे, ही सुद्धा वाढत्या घटस्फोटाची कारणं आहेत.
एकीकडे सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला आपण संपर्क करू शकतो. कित्येक वर्ष न भेटलेले जीवलग मित्र-मैत्रीणही आपल्याला सोशल मीडियावरच सापडत आहेत. पण जगाला जवळ आणणारं हेच सोशल मीडिया आपल्या समोर असलेल्या व्यक्तीपासून आपल्याला लांब होत असल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे.