मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आलेली होती. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी पाच जणांना ताब्यात घेतलेलं आहे. आता पोलिस सुरक्षा रक्षकाची चूक आढळून आल्याने त्याला निलंबित करण्यात आलंय.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कॉन्स्टेबलकडून चूक झाल्याच निष्पन्न झालं आहे. त्यामुळे कॉन्स्टेबल शाम सोनावणे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे.
फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता, असा दावा निलंबित कॉन्स्टेबल सोनावणे यांनी केला. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची देण्यात सुरक्षा पुरविण्यात आली होती.
दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली आहे. आतापर्यंत ताब्यात घेतलेल्यांची संख्या ९ झालेली असून पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.
दुसरीकडे, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके देशाच्या विविध भागात पाठवण्यात आलेली आहेत. ते आरोपींचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि पानवे येथे गुन्हे शाखेने छापे टाकले. या छाप्यादरम्यान पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.
काऊंटर फायरिंग का केलं नाही?
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने काऊंटर फायरिंग का केलं नाही? असा प्रश्न पोलिस चौकशीदरम्यान उपस्थित करण्यात आला. मात्र पोलिस सुरक्षा रक्षकाने दृष्यमानतेचं कारण दिल्याची माहिती आहे. याबाबत पोलिस कसून चौकशी करीत आहेत.


