
नागपूर प्रतिनिधी
सोमवारी सायंकाळच्या सुमारास नागपुरात दोन गटांत तुफान दगडफेक झाली. समाजकंटकांनी तोडफोड करत जाळपोळही केली आहे. जमावाला पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर समाजकंटकांनी हल्ला केला आहे.
यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. यावेळी पोलीस आयुक्त हे दगडफेकीत जखमी झाले आहेत. तर, पोलीस उपायुक्तांच्या हातावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी तरूणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले आणि मोठा जमाव रस्त्यावर आला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली. पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
पोलीस उपायुक्तांवर हल्ला
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे रस्त्यावर उतरले होते. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त जखमी झाले आहेत. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील एकाने धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात कदम यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झाली. त्यांना प्रथम मेयो रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
80 जणांना केली अटक
दगडफेकीच्या घटनेनंतर कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारावर आहेत. रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी 80 जणांना ताब्यात घेतले आहे.